आजही धर्म आणि सामाजिक सुधारणा होणे गरजेचे   

डॉ.सुनिलकुमार लवटे यांचे मत

पुणे : न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे १९व्या आणि २०व्या शतकातील महाराष्ट्रातील प्रभावशाली व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी धर्म आणि सामाजिक सुधारणांवर आपापल्या दृष्टीकोनातून मोलाचे योगदान दिले. या तिन्ही महापुरुषांनी महाराष्ट्राबरोबरच भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक परिदृश्याला समृद्ध केले असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व माजी प्राचार्य डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी केले. आजही धर्म आणि सामाजिक सुधारणा होणे गरजेचे असल्याचे यावेळी विविध दाखले देऊन त्यांनी स्पष्ट केले.
 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रात ‘न्या. रानडे, लो. टिळक, तर्कतीर्थ ः धर्म आणि सामाजिक सुधारणा’ या विषयावर डॉ. लवटे यांनी व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफले.डॉ. लवटे म्हणाले, न्या. रानडे, लोकमान्य आणि तर्कतीर्थ या तिघांनी धर्मसुधारणेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. लोकमान्यांनी स्वराज्यासाठी काम केले. त्यांनी देशभर लोकजागृती करण्यासाठी व्याख्याने दिली. त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी लोकांची अफाट गर्दी होत असे. त्यांचे व्याख्यान ऐकून लोकांमध्ये परिवर्तन होत होते.
 
तर्कतीर्थांनी परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधला. त्यांचा दृष्टीकोन बौद्धिक, प्रबोधनात्मक आणि सामाजिक क्षमतेवर अधारित होता. त्यांनी  हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान, नीतीशास्त्र आणि वैदिक संस्कृतिचा सखोल अभ्यास केला. त्यांचे धर्मकोश आणि मीमांसाकोश हे ग्रंथ हिंदू धर्मातील प्राचीन शास्त्रांचे संकलन आणि विश्लेषण करतात, ज्यामुळे धर्माचा बौद्धिक आढावा घेण्यास मदत झाली. मराठी विश्वकोशाच्या १५ खंडांची निर्मिती करुन मराठीला ज्ञानभाषा बनवले. 
 
१९वे शतक उजाडले तेव्हा महाराष्ट्रात सुधारणेचे वारे आले होते. या काळात सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उलथापालथ झाली. युरोपात वैचारिक क्रांती झाली. शिक्षण, विज्ञान आणि वाचनाने तेथील नागरिकांनी आपल्यात परिवर्तन केले. युरोपात साक्षरता आली. परंतु आपल्याकडे साक्षरता झाली नसल्याने परिवर्तन झाले नाही. त्यामुळे धर्माचे सावट तसेच राहिले, असेही यावेळी डॉ. लवटे यांनी सांगितले. समाज जीवनात परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे यावेळी   त्यांनी नमूद केले.
 
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य दीपस्तंभासारखे आहे. समाज जोपर्यंत शिक्षित होत नाही, तोपर्यंत परिवर्तन होत नाही. शिक्षणामुळे समाज प्रगल्भ होते. कृतीशील शिक्षण जोपर्यत आपल्यात जीवनात येणार नाही, तोपर्यंत बदल होणार नाही, असेही यावेळी डॉ. लवटे म्हणाले.  धर्म आणि समाजसुधारणेचे अभ्यास करण्याची आजही आपल्याला गरज असल्याचे यावेळी डॉ. लवटे यांनी नमूद केले. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या कार्यकारिणीचे सदस्य स्वप्निल पोरे यांनी डॉ. लवटे यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन मनिषा पुराणिक यांनी केले.
 

Related Articles